Nithin Kamath On Jane Street Manipulation And SEBI Action: झेरोधाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक नितीन कामथ यांनी, अमेरिकी ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीटवर शेअर बाजारातील कथित गैरप्रकाराबद्दल कारवाई केल्यानंतर सेबीचे कौतुक केले आहे. जेन स्ट्रीट फर्मवर बाजारात गैरप्रकार करून ३६,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावल्याचा आरोप आहे.
दरम्यान, नितीन कामथ यांनी या प्रकरणी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये, जेन स्ट्रीटच्या कथित कृतींना “बाजारातील उघड फेरफार” असे म्हटले आहे. तसेच, सेबीने अनेकदा इशारे देऊनही जेन स्ट्रीटकडून गैरप्रकार सुरूच राहिल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
गुरुवारी सायंकाळी दिलेल्या १०५ पानांच्या आदेशात, सेबीने डेरिव्हेटिव्ह्ज विभागातील व्यवहारांद्वारे जेन स्ट्रीटने भारतीय शेअर बाजार निर्देशांकांमध्ये कसे फेरफार केले याची तपशीलवार माहिती दिली आहे. याचबरोबर, सेबीने जेन स्ट्रीट फर्मविरुद्ध आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई करत, त्यांना भारतीय शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. कथित फेरफारद्वारे कमावलेला पैसा बेकायदेशीर नफा असल्याचे नमूद करत, सेबीने ४,८४३ कोटी रुपये जप्त केले आहेत.
“जेन स्ट्रीटवर कारवाई केल्याबद्दल सेबीला श्रेय द्यायलाच हवे. जर आरोप खरे असतील, तर ही स्पष्टपणे बाजारातील फेरफार आहे. धक्कादायक गोष्ट अशी की, सेबीने इशारे दिल्यानंतरही ते ही फेरफार करत राहिले,” असे नितीन कामथ यांनी शुक्रवारी, ४ जुलै रोजी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे कामथ यांनी असा अंदाज व्यक्त केला की, अमेरिकेत कडक नियामक व्यवस्था नसल्यामुळे जेन स्ट्रीटने तिथेही त्यांच्या गैरप्रकारांच्या पद्धती सुरू ठेवल्या असण्याची शक्यता आहे.
“जेव्हा तुम्हाला अमेरिकेच्या सौम्य नियामक व्यवस्थेची सवय होते, तेव्हा कदाचित असेच घडते. अमेरिकन बाजारपेठांच्या रचनेचा विचार करा: डार्क पूल, ऑर्डर फ्लोसाठी पेमेंट आणि इतर त्रुटी ज्यामुळे हेज फंड किरकोळ गुंतवणूकदारांकडून अब्जावधी रुपये कमवू शकतात. मात्र, सेबीमुळे भारतात यापैकी कोणत्याही पद्धतींना थारा नाही,” असे नितीन कामथ यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर, नितीन कामथ यांनी सेबीच्या जेन स्ट्रीटवरील कारवाईच्या दुसऱ्या बाजूकडेही लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले की, ही कारवाई एक्सचेंज आणि ब्रोकर्स दोघांसाठी अडचणीची ठरू शकते. कारण जेन स्ट्रीटसारख्या लोकप्रिय ट्रेडिंग फर्म्स भारतातील डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमधील ऑप्शन्स व्हॉल्यूमचा मोठा वाटा हाताळतात.