4500 year old civilization India: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) राजस्थानमधील धोलपूर जिल्ह्यातील बहज गावात इ.स.पू. ३५०० ते १००० या कालखंडातील एका प्राचीन संस्कृतीचे अवशेष उघडकीस आणले आहेत. याच ठिकाणी २३ मीटर खोल एक प्राचीन नदीप्रणाली (पॅलिओचॅनेल) देखील सापडली आहे. पुरातत्त्व संशोधक या ठिकाणाचा संबंध ऋग्वेदात उल्लेखलेल्या सरस्वती नदीशी जोडत आहेत.

असा दावा केला जात आहे की, ही प्राचीन जलप्रणाली सरस्वती नदीच्या काठावर वसलेल्या एका समृद्ध संस्कृतीचा पाया ठरली असावी. मथुरेपासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण सरस्वती खोऱ्याच्या सांस्कृतिक वारशाचा उलगडा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. पाच महिन्यांच्या उत्खनन मोहिमेदरम्यान हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींसह या संस्कृतीशी संबंधित प्राचीन दागिन्यांचाही शोध लावण्यात आला.

सुमारे ४ मीटर खोलीवर एका स्त्रीचा सांगाडा आणि मोठ्या प्रमाणात प्राचीन चांदी व तांब्याच्या नाण्यांचा साठा सापडला आहे. या परिसराचा संबंध भगवान कृष्णाचा नातू वज्रनाथ याच्या ‘वज्रनाथाची खेडा’ या स्थानाशी असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोविंदन रोडलगतच्या या ठिकाणी ASI ने मागील वर्षी १० जानेवारीपासून उत्खनन सुरू केले. सापडलेल्या अवशेषांवर सध्या अभ्यास सुरू आहे.

महाभारतकालीन भांड्यांचा खजिना सापडला

या ठिकाणी हाडांपासून तयार केलेल्या वस्तू, रत्नांच्या माळा, शंखाच्या बांगड्या, १५ यज्ञकुंड, शिव आणि पार्वतीच्या मूर्ती अशा अनेक वस्तू सापडल्या असून त्यांचा कालखंड इ.स.पू. १००० च्या आधीचा मानला जातो. ब्राह्मी लिपीतील शिक्के, महाजनपदकालीन वाळू व मातीने भरलेले यज्ञकुंड, मातीच्या लहान भांड्यांमध्ये ठेवलेली तांब्याची नाणी असेही अवशेष उत्खननादरम्यान उघडकीस आले आहेत. महाभारतकालीन मृद्भांडांचा समृद्ध साठा या ठिकाणी सापडलेला आहे. टेकडीखाली प्राचीन भिंतींचे अवशेषही सापडले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जैन शिलालेखांमध्ये बहज गावाचा उल्लेख ‘वजनगर’ असा केला गेला आहे. येथील टेकड्यांना ‘कंकाली टीला’ असेही म्हटले जाते. ‘बहज’ हे नाव ‘वज्रनगरी’ या शब्दाचा तद्भव रूप असल्याचे मानले जाते. गावातील प्राचीन टेकडीचा मोठा भाग सध्या वस्ती वाढीमुळे अतिक्रमित होत आहे. हे ठिकाण ब्रज क्षेत्रातील ८४ कोस परिक्रमा मार्गावर आहे.