वृत्तसंस्था, जकार्ता / नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने काही लढाऊ विमाने ‘राजकीय मर्यादां’मुळे गमावल्याचे विधान इंडोनेशियातील भारतीय दूतावासात असलेले संरक्षणविषयक अधिकारी कॅप्टन शिव कुमार यांनी केल्यावरून देशात वादळ उठले आहे. यावरून काँग्रेसने केंद्राला धारेवर धरत स्पष्टीकरण मागितल्यानंतर आता जकार्तामधून सारवासारव करण्याची वेळ सरकारवर आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईबाबत जकार्तामध्ये आयोजित एका परिसंवादात कॅप्टन शिव कुमार सहभागी झाले होते. यावेळी ‘भारतात असलेल्या राजकीय मर्यादांमुळे लष्करी कारवाईच्या सुरुवातीच्या काही तासांत भारताने आपली लढावू विमाने गमावली,’ असे ते म्हणाले होते. यावरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावरून केंद्रावर तोफ डागली. कॅप्टन शिव कुमार यांनी केलेल्या या विधानाची शहानिशा करण्यात आलेली नसून त्यावर सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे रमेश यांनी लिहिले. त्यानंतर सोमवारी इंडोनेशियातील भारतीय दूतावासाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
परिषदेमध्ये कॅप्टन कुमार यांनी केलेले विधान संदर्भ सोडून वापरण्यात आल्याचा दावा दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात करण्यात आला. “भारतातील संरक्षणदले ही नागरी राजकीय नेतृत्वाखाली काम करतात. आमच्या काही शेजारी देशांमध्ये अशी परिस्थिती नाही” असे कॅप्टन कुमार म्हणाले होते. तसेच ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचे असून तणाव वाढू नये, या उद्देशाने भारताने प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी आपल्या परिसंवादात सांगितल्याचा दावा दूतावासामार्फत करण्यात आला आहे.
कॅप्टन कुमार नेमके काय म्हणाले?
“भारतीय दलांना पाकिस्तानची लष्करी आस्थापने किंवा हवाई सुरक्षा प्रणाली लक्ष्य न करण्याच्या सूचना होत्या. केवळ राजकीय नेतृत्वाने आखून दिलेल्या या मर्यादांमुळे भारतीय वायूदलाने आपली काही लढावू विमाने गमावली. या सुरुवातीच्या नुकसानानंतर आम्ही रणनीतीत बदल केले आणि काही लष्करी तळ उद्ध्वस्त केले. आधी आम्ही हवाई सुरक्षा यंक्षणेला लक्ष्य केले… त्यानंतर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे सहज लक्ष्यभेद करू शकली,”