Donald Trump Hints India-US Trade Deal: अमेरिकेतील आयात शुल्क स्थगिती संपण्यापूर्वी व्यापार करारासाठी अमेरिका आणि भारत यांच्यात वाटाघाटी सुरू असताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी भारतासोबत “सर्वात मोठ्या व्यापार कराराचे” संकेत दिले आहेत. बिग ब्युटीफुल बिल कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली. २ एप्रिल रोजी, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर २६ टक्के परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हा निर्णय ९ जुलैपर्यंत ९० दिवसांसाठी स्थगित केला होता.
कोणत्याही देशासोबत व्यापार करार केले जाणार नाहीत हे स्पष्ट करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “प्रत्येकाची अमेरिकेशी करार करण्याची आणि त्यात सहभागी होण्याची इच्छा आहे. काही महिन्यांपूर्वी, प्रसारमाध्यमे म्हणत होती की, ‘तुम्हाला खरोखरच कोणाचे हित साधायचे आहे का?’ बरं, आम्ही कालच चीनसोबत व्यापार करारावर स्वाक्षरी केली. आमचे काही उत्तम करार होत आहेत. कदाचित भारतासोबत आमचा आणखी एक सर्वात मोठा व्यापार करार होत आहे.”
गुरुवारी स्थानिक वेळेनुसार वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित बिग ब्युटीफुल बिल कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी चीनसोबत झालेल्या कराराचे किंवा भारतासोबत होणाऱ्या मोठ्या व्यापार कराराचे तपशील स्पष्ट केले नाहीत.
“आम्ही सर्वांशी करार करणार नाही. काहींना आम्ही फक्त पत्र पाठवून ‘खूप खूप धन्यवाद’ असे सांगणार आहोत. तुम्हाला २५, ३५, ४५ टक्के शुल्क द्यावे लागेल. ते करण्याचा हा सोपा मार्ग आहे आणि माझे लोक ते अशा प्रकारे करू इच्छित नाहीत. त्यांना काहीतरी मोठे करायचे आहे, ते माझ्यापेक्षा जास्त करार करण्यास उत्सुक आहेत,” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
एएनआय वृत्तसंस्थेच्या मते, या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिका-भारत व्यापर चर्चेदरम्यान अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी स्पष्ट केले होते की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार लवकरच अंतिम केला जाऊ शकतो. लुटनिक म्हणाले होते की, “आम्ही खूप चांगल्या स्थितीत आहोत आणि नजीकच्या भविष्यात अमेरिका आणि भारत यांच्यात करार होण्याची अपेक्षा करावी कारण मला वाटते की आम्ही अशा परिस्थितीत पोहोचलो आहोत जी दोन्ही देशांसाठी खरोखर चांगली आहे.”
१० जून रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले होते की, भारत आणि अमेरिका एक निष्पक्ष व्यापार करारावर वाटाघाटी करत आहेत ज्याचा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना फायदा होईल.