Iran’s parliament approves closure of Strait of Hormuz: इस्रायल-इराण याच्यातील संघर्षाचा आज १०वा दिवस आहे. इराण आणि इस्रायल युद्धात आता अमेरिकेने देखील उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणु केंद्रांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता इराणने मोठे पाऊल उचलले आहे. इराणच्या संसदेने अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) म्हणजेच होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
इराणचा मोठा निर्णय
ही माहिती इराणच्या सरकारी प्रेस टीव्हीने रविवारी दिली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगभरातील तेल व्यापाराासठी खूप महत्त्वाचा मार्ग आहे, येथून जवळपास ३० टक्के जागतिक पेट्रोलियम शिपमेंटची वाहतूक होते. हे बंद करण्याचा निर्णय संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो. सध्या संसदेत या प्रस्तावावर एकमत झाले आहे, मात्र अंतिम निर्णय इराणची सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषद घेईल. ही परिषदच देशाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय घेते.
संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य मेजर जनरल कोवसारी यांनी सांगितले की, हा प्रस्ताव जनतेची भावना दाखवून देतो, मात्र हा लागू करण्यासाठी सुरक्षा परिषदेची मंजूरी आवश्यक आहे.
भारतावरही होणार परिणाम
अमेरिकेने शनिवारी इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर लगेचच इराणने ते होर्मुझ सामुद्रधुनी बंद करू शकतात असे संकेत दिले होते. तज्ज्ञांच्या मते जर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्यात आले आणि जहाजांची ये-जा बंद झाली तर संपूर्ण जगाबरोबरच भारतावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. इराणच्या या निर्णयानंतर तेलाचा पुरवठा कमी होईल आणि महागाई वाढू शकते. यामुळे भारताच्या आर्थिक गतीवर देखील परिणाम होऊ शकतो.
होर्मुझ सामुद्रधुनी काय आहे?
होर्मुझ सामुद्रधुनी ही पर्शियन खाडीला अरबी समुद्राशी जोडते. हा एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. जगभरात पुरवठा केले जाणारे तेल आणि एलएनजी याचा जवळपास ३० टक्के हिस्सा याच मार्गावरून जातो. जर हा रस्ता बंद झाला तर तेलाचा पुरवठा कमी होईल आणि किंमती देखील वाढतील.