Israel-Iran Conflict : इस्त्रायल आणि इराणमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या शहरात हवाई हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलकडून इराणमधील गॅस रिफायनरी आणि तेल डेपो लक्ष्य केले जात आहेत. तसेच इस्त्रायलच्या हवाई दलाने तेहरानच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण मिळवल्याचा दावा पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला आहे.

इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलने तेहरानमधील इराणच्या सरकारी टीव्ही स्टुडिओच्या मुख्यालयावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. तेहरानमधील राष्ट्रीय टीव्ही वृत्तवाहिनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगच्या (IRIB) इमारतीवर बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत. या संदर्भातील एक व्हिडीओ समोर आला असून लाईव्ह प्रक्षेपण सुरु असताना अचानक हल्ला झाल्यामुळे अँकरला लाईव्ह प्रक्षेपणामधून पळून जात जीव वाचवण्याची वेळ आल्याचं व्हिडीओत दिसून आलं आहे.

इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोट दिसून आले आहेत. इस्रायलने आयआरआयबी मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यानंतरचा व्हिडीओ एका कॅमेऱ्यात कैद झाला असून आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यापूर्वी इस्रायलने तेहरानमधील एका लष्करी तळावर हल्ला केला होता. तसेच इस्रायलने तेहरानला लक्ष्य केलं असून तेहरानच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं इराणच्या काही वृत्तसंस्थेनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

सतत पडतायेत क्षेपणास्त्रे, तेहरानमध्ये भीतीचं वातावरण

तेहरानवर होत असलेले हल्ले युद्धाच्या क्रूरतेचे प्रतिबिंब असल्याचं बोललं जात आहे. कारण तेहरानच्या अनेक भागांवर सतत इस्रायल क्षेपणास्त्र हल्ला करत आहे. केवळ लष्करी तळांना लक्ष्य केले जात नाही तर आता मीडिया सेंटर आणि सार्वजनिक इमारतींवरही बॉम्ब हल्ले होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर लोकांची चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होत असून अनेक लोक शहरातून बाहेर पडत आहेत.

तेहरानच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण मिळवल्याचा इस्त्रायलचा दावा

इस्त्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये प्रादेशिक तणाव कमालीचा वाढला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्त्रायलच्या हवाई दलाने तेहरानच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. आज सकाळी इस्रायलच्या लष्कराने इराणच्या राजधानीवर एरियल सुपीरियरिटी म्हणजेट हवाई वर्चस्व मिळवल्याचा दावा केला होता. इस्त्रायलच्या लष्कराने सांगितले की, त्यांनी इराणच्या हवाई सुरक्षा आणि क्षेपणास्त्र प्रणालीचे इतके नुकसान केले की आता त्यांची विमाने कोणत्याही मोठ्या धोक्याशिवाय तेहरानवरून उड्डाणे करू शकतात.