RSS Leader Dattatreya Hosabale on Indian Constitution : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिली आणि एकमेव आणीबाणी लागू करण्याला नुकतीच (२५ जून) ५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्त भारतीय जनता पार्टीने २५ जून हा काळा दिवस म्हणून पाळला. यात भाजपाची मातृसंस्था आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) देखील सहभागी होती. या आणीबाणीबद्दल बोलताना आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतून ‘समाजवादी’ व ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकण्याबद्दल विचार करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसवर टीका करताना होसबाळे म्हणाले, “तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने २५ जून १९७५ रोजी आणबाणी जाहीर केली. तब्बल २१ महिने (२१ मार्च १९७७ पर्यंत) ही आणीबाणी कायम होती. या काळात सरकारने लोकांचं नागरी स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर व प्रसारमाध्यमांवर क्रूरपणे कारवाया केल्या जात होत्या”. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना होसबाळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले, “आणीबाणीच्या काळात काँग्रेस सरकारने घटनेच्या प्रस्ताविकेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द जोडले होते, हे शब्द घटनेच्या प्रस्ताविकेत तसेच ठेवायचे का याबाबत विचार करायला हवा.
आणीबाणी लादल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी; होसबाळे यांची मागणी
समाजवादी व धर्मनिरपेक्ष या संज्ञा आणीबाणीच्या कालखंडात काँग्रेसने घटनेत समाविष्ट केल्याचं नमूद करताना होसबाळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात मात्र या संज्ञा नव्हत्या. तत्कालीन इंदिरा गांधी यांच्या सरकारने ५० वर्षांपूर्वी देशावर आणीबाणी लादल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा केली आणि त्यानंतर सरकारने हजारो नागरिकांना तुरुंगात डांबून त्यांचा छळ केला होता. न्यायव्यवस्था व माध्यमांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादले. या गोष्टी ज्यांनी केल्या तेच आज देशभर घटनेच्या प्रती घेऊन फिरत आहेत, अशी टीका देखील होसबाळे यांनी केली.
भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २५ जून हा संविधान हत्येच्या दिवस म्हणून पाळला. याबद्दल बोलताना दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, “१९७५ ते १९७७ या दोन वर्षांत आपल्या नागरिकांनी अमानवी अत्याचार सहन केले. आणीबाणीच्या काळात लोकांची सक्तीने नसबंदी करण्यात आली होती. जनतेचं नागरी स्वातंत्र्य देखील हिरावलं होतं. मात्र, जनतेने सरकारशी संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाची आपण आठवण ठेवली पाहिजे”.