Russia Warns US Over Attack On Iran: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला इराण-इस्रायल यांच्यातील लष्करी संघर्ष आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी इराणवर हल्ला करण्याचे संकेत दिले होते. यावर आता रशियाने अमेरिकेला कडक इशारा दिला असून, इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत इस्रायलला पाठिंबा देऊ नये, असे सांगितले आहे.
रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव्ह नुकतेच म्हणाले की, जर अमेरिकेने इस्रायलला थेट लष्करी मदत दिली, तर मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अशा मदतीचा विचार करणेही धोकादायक ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.
“हे असे पाऊल असेल, जे संपूर्ण परिस्थिती पूर्णपणे अस्थिर करेल,” असे रियाबकोव्ह यांनी रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सला सांगितले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, रशिया आणि अमेरिका संपर्कात असून, इराण-इस्रायल संघर्षाबाबत चर्चा सुरू आहे.
गेल्या शुक्रवारीपासून, इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर तसेच काही शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ लष्करी नेत्यांवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, रशियाने या हल्ल्यांना सुरुवातीपासूनच विरोध केला आहे.
प्रत्युत्तरादाखल, इराणनेही गेल्या काही दिवसांपासून इस्रायली शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. यामुळे या प्रदेशात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत.
आपत्तीपासून फक्त काही मिलिमीटर दूर
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने असा इशाराही दिला आहे की, इस्रायलकडून इराणच्या अणु प्रकल्पांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे हा प्रदेश आपत्तीच्या अगदी जवळ आला आहे, “आपत्तीपासून फक्त काही मिलिमीटर दूर.”
इराणमधील अणुप्रकल्पावरील हल्ले थांबवण्याचे रशियाचे इस्रायलला आवाहन
इस्रायलने इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर केलेले हवाई हल्ले तात्काळ थांबवावेत, असे आवाहन रशियाच्या परराष्ट्र खात्याने केले आहे. या प्रकल्पात रशियन तज्ज्ञ कार्यरत आहेत.
बुशेहर हा इराणमधील एकमेव कार्यरत अणुऊर्जा प्रकल्प आहे. या ठिकाणी रशियन इंधन वापरण्यात येते. अण्वस्त्र प्रसाराचा धोका टाळण्यासाठी वापरानंतर रशिया इंधन परत घेते.
इस्रायल इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेऊ नये असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी म्हटले आहे. तसे झाल्यास गंभीर परिणाम होतील असा धमकीवजा इशाराही रशियानं दिला आहे.