American Woman Tourist in Gurugram Video Row : गुरुग्रमस्थित पंचतारांकित हॉटेल कोर्टयार्ड बाय मेरिएटमध्ये थांबलेल्या अमेरिकन महिलेने एक गंभीर आरोप केला आहे. तिचं म्हणणं आहे की हॉटेलमध्ये ती जेव्हा उन्हात बसून सनबाथचा आनंद घेत होती तेव्हा हॉटेलमधीलच एक व्यक्ती लपून-छपून तिचे व्हिडीओ चित्रित करत होता. महिलेने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत तिला आलेला अनुभव तिने शेअर केला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये सदर महिलेने व तिच्या मैत्रिणींनी हॉटेलमधील एका खोलीच्या खिडकीकडे इशारा केला आणि म्हणाली, “त्या खिडकीत उभा असलेला इसम आमचा व्हिडीओ चित्रित करतोय असं वाटतंय. कोणीतरी आमचे फोटो काढतोय हे आम्हाला जाणवतंय”. हा व्हिडीओ आतापर्यंत ८० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओबरोबर महिलेने कॅप्शनमध्ये लिहिलंय की “मला वाटतंय की आता आम्हाला नवा टाइमपास शोधावा लागेल. तुम्ही महिला असाल आणि भारतात येणार असाल तर एकटीने येऊ नका. तुम्ही साधे कपडे परिधान केलेले असोत अथवा स्विमसूट, इथे तुम्हाला अशी वागणूक मिळणं, तुमचे फोटो काढलं जाणं खूप सामान्य आहे”.
परदेशी महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी या महिलेचं समर्थन करत हॉटेलकडून उत्तर मागितलं आहे. तर, काही लोकांनी भारतातील सार्वजनिक ठिकाणांवरील व्हिडीओ चित्रित करण्यासंदर्भातील नियमांच्या अस्पष्टतेकडे इशारा केला आहे. भारतात कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ चित्रित करणं ग्रे झोनमध्ये येतं. मात्र, कुठल्याही खासगी ठिकाणी कोणी व्हिडीओ चित्रित केला तर तो अपराध मानला जातो. यासाठी भारतीय कायद्यात शिक्षेची देखील तरतूद आहे.
दरम्यान, या महिलांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी दोन्ही देशांमधील सांस्कृतिक फरकाकडे लक्ष वेधलं आहे. तिचं म्हणणं आहे की “भारतातील महिला पोहताना देखील पूर्ण अंग झाकेल असे कपडे परिधान करतात. मात्र, आम्ही फ्लोरिडामधून आलेलो आहोत. तिकडे आमच्यासाठी स्विमसूट, बिकिनी परिधान करणं खूपच सामान्य बाब आहे”. दरम्यान, कोर्टयार्ड बाय मेरिएट हॉटेलने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ही घटना भारतात परदेशी महिलांच्या सुरक्षेवर व एकांतावर (प्रायव्हसी) गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.