डेंग्यू या कीटकजन्य आजारावर अद्याप कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. जगभरात रुग्णांच्या स्थितीनुसार त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यात वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटेमॉल दिले जाते. रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास रुग्णालयात दाखल करावे लागते. त्याला प्लेटलेट देण्याची आवश्यकता भासते. जगातील सर्वांत मोठी लस निर्मिती कंपनी ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने डेंग्यूवरील प्रभावी उपचार पद्धती विकसित करण्यासाठी पावले उचलली आहेत. डेंग्यूवरील उपचारांसाठी मोनोक्लोनल अँटिबॉडी पद्धती विकसित केली जात आहे. ही उपचारपद्धती विकसित करण्यास गती देण्यासाठी ‘सीरम’ने ‘ड्रग्ज फॉर निग्लेक्टेड डिसीजेस इनिशिएटिव्ह’ (डीएनडीआय) या स्वयंसेवी संशोधन संस्थेबरोबर करार केला आहे.

डेंग्यूचा प्रादुर्भाव किती?

जगभरात डेंग्यूची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगातील तब्बल ३.९ अब्ज लोकसंख्येला डेंग्यूचा धोका आहे. जगात २००० मध्ये डेंग्यूच्या सुमारे ५ लाख रुग्णांची नोंद झाली होती. ही संख्या २०१९ मध्ये ५२ लाखांवर पोहोचली. त्यानंतर २०२३ मध्ये ही संख्या ६५ लाखांवर पोहोचली आणि त्या वर्षात डेंग्यूमुळे ७ हजार ३०० जणांचा मृत्यू झाला. डेंग्यूची लक्षणे ही इतर कीटकजन्य आजारांसारखी असल्याने अनेक वेळा त्याचे निदान होत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात रुग्णसंख्या त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. डेंग्यूची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जगातील पहिल्या ३० देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे.

नेमकी उपचारपद्धती काय?

डेंग्यूवर सध्या कोणतेही विषाणूप्रतिबंधक औषध उपलब्ध नाही. सध्या उपलब्ध औषधांच्या माध्यमातून आजाराची तीव्रता कमी करून रुग्णाची प्रकृती गंभीर होऊ नये, याची केवळ खबरदारी घेतली जाते. त्यामुळे मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचार पद्धती रुग्णांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या उपचार पद्धतीत अँटीबॉडी या प्रयोगशाळेत तयार करण्यात येतात. त्या मानवी शरीरातील अँटिबॉडींना पर्याय ठरतात. या अँटिबॉडी मानवाच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीमध्ये वाढ करतात. त्यांचा वापर ठरावीक विषाणूंना लक्ष्य करण्यासाठी केला जातो. डेंग्यूच्या विषाणूचे चार प्रमुख प्रकार असून, त्यावर प्रभावी ठरणारी ही मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचार पद्धती विकसित करण्यात येत आहे. अमेरिकेतील विस्टेरा या जैवतंत्रज्ञान कंपनीने ही उपचार पद्धती विकसित केली असून, तिच्या चाचणीचा परवाना सीरमला देण्यात आला आहे. ‘सीरम’कडून आता या उपचार पद्धतीच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत.

भागीदारीतून काय?

डेंग्यूवरील नवीन उपचार पद्धती विकसित करण्याचा कृती आराखडा ‘सीरम’ आणि ‘डीएनडीआय’ तयार करणार आहेत. त्यात संशोधन व विकासासोबत या उपचार पद्धतींच्या वैद्यकीय चाचण्यांचाही समावेश आहे. तसेच, यासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत. वैद्यकीय चाचण्यांसाठी दोन्ही संस्था संयुक्त पथक स्थापन करणार आहेत. या उपचार पद्धतीच्या अभ्यासातून ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संयुक्त पथक भारत आणि डेंग्यूग्रस्त इतर देशांमध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचार पद्धतीची नोंदणी आणि तिचा प्रत्यक्षात वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे.

चाचण्या कोणत्या टप्प्यात?

सध्या डेंग्यूवरील मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचार पद्धतीच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. त्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. या चाचण्यांत ही उपचार पद्धती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘सीरम’कडून या उपचार पद्धतीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. आता सीरम आणि डीएनडीआय एकत्र येऊन डेंग्यूचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या ब्राझीलसह इतर देशांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू करणार आहेत. या उपचार पद्धतीच्या पहिल्या टप्प्यांत तिचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत.

परवडणाऱ्या दरात उपचार?

भारतात दर वर्षी डेंग्यूचे हजारो रुग्ण आढळून येतात. याचबरोबर दर दोन ते तीन वर्षांनी वेगवेगळ्या राज्यांत डेंग्यूचा उद्रेक होतो. डेंग्यू हा आजार केवळ ठरावीक भागापुरता मर्यादित नाही. डेंग्यूवर नियंत्रणासाठी प्रभावी सर्वेक्षणासोबत त्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर डेंग्यूवर प्रभावी उपचार पद्धतीची आवश्यकता आहे. ‘सीरम’ आणि ‘डीएनडीआय’च्या भागीदारीमुळे त्या दिशेने पाऊल पडले आहे. गरीब व मध्यम उत्पन्न गटातील देशांना परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याचे काम ‘डीएनडीआय’ करते. यामुळे भविष्यात भारतासह इतर देशांत डेंग्यूवरील हे उपचार परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

[email protected]