वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एका खास कार्यक्रमाकडे जगभराचे लक्ष लागले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी व्हाईट हाऊसच्या कॅबिनेट रूममध्ये खासगी जेवणाचे आयोजन केले होते. ही बैठक साधारण नव्हती. कारण- गेल्या २० वर्षांत दुसऱ्यांदा अमेरिकेत पाकिस्तानी लष्कराच्या जनरलला इतक्या उच्च पातळीवर सन्मानित करण्यात आले. यापूर्वी जनरल परवेझ मुशर्रफ यांना ही संधी मिळाली होती आणि विशेष म्हणजे ९/११च्या हल्ल्यानंतर.
कोण आहे साजिद तरार?
भूतकाळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे आणि प्रादेशिक शांतता उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. साजिद हे व्यापारी वकील, कार्यकर्ता आणि बाल्टीमोर येथे राहणारे राजकीय व्यक्ती आहेत. पाकिस्तानातील पंजाबमधील मंडी बहाउद्दीन इथे जन्मलेल्या तरार यांनी १९८०-९० च्या दरम्यान अमेरिकेत स्थलांतर केले. त्यांनी बाल्टीमोर विद्यापाठीतून कायद्याचा अभ्यास केला आणि अमेरिकन नागरिकत्वही मिळवले. साजिद तरार यांचे अनेक व्यवसाय आहेत. तसेच मॅक्सिमस इन्व्हेस्टमेंट ग्रुपचे ते अध्यक्ष म्हणून काम करतात. ही वित्त आणि बांधकाम क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. ते सेंटर फॉर सोशल चेंजचे सीईओदेखील आहेत. ही बाल्टीमोर आधारित समुदाय कार्यक्रम आणि सामाजिक सेवांवर लक्ष केंद्रित करणारी एक एनजीओ आहे.
२०१६ पासून डोनाल्ड ट्रम्प यांचे एक कट्टर समर्थक म्हणून त्यांनी ‘द अमेरिकन मुस्लिम्स फॉर ट्रम्प’ची स्थापना केली. त्यांनी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शन्समध्ये भाषणेही दिली. मुस्लीम अमेरिकन समुदायातील रूढीवादी मूल्यांचे समर्थन करण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांनी मुस्लीम अमेरिकन सहभागावर ट्रम्प यांचे सल्लागार म्हणूनही काम केले आहे. तसेच प्रशासनाच्या धोरणांचे समर्थन करताना रूढीवादी माध्यमांमध्ये ते वारंवार सक्रियपणे दिसले आहेत.
टाइम्स ऑफ इंडिया आणि फर्स्ट पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, साजिद तरार यांचा प्रभाव राजकीय वर्तुळाच्या पलीकडे आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात तरार त्यांच्या मुलाने अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात काम केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वॉशिंग्टनच्या रूढीवादी स्थापनेत त्यांचे एकीकरण आणखी स्पष्टपणे दिसून येते.
भारत-पाकिस्तान संबंधांवरही लक्ष
साजिद तरार यांचे नाव फक्त पाकिस्तानपुरते मर्यादित नाही. त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शांततेच्या बाजूने अनेक वेळा विधाने केली आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले आहे. म्हणूनच तरार यांच्याकडे पारंपरिक राजकारणाचा मार्ग सोडून वैयक्तिक नेटवर्क आणि संबंधांच्या आधारे देशांना जोडण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणून पाहिले जात आहे.

पाकिस्तान सरकारला काळजी का?
या बैठकीमुळे इस्लामाबादच्या नागरी सरकारमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कारण- या उच्चस्तरीय बैठकीत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय किंवा सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी एका खासगी अमेरिकन नागरिकाने इतक्या मोठ्या प्रमाणात संवाद साधल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. लष्करी राजकारणात हस्तक्षेप केल्याबद्दल पाकिस्तानवर आधीच टीका झालेली आहे. आणि या बैठकीनंतर पुन्हा वादविवाद सुरू झाला आहे.
बैठकीत काय चर्चा झाली?
अमेरिकेतील राजनैतिक सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अनेक मोठ्या ऑफर दिल्या आणि काही कठोर अटीही घातल्या. त्यांनी पाकिस्तानकडून बिनशर्त लष्करी आणि धोरणात्मक सहकार्याची मागणी केली. त्यामध्ये अमेरिकेला हवाई तळ, जमिनी रसद आणि सागरी मार्गांपर्यंत प्रवेश प्रदान करणे यांचा समावेश होता. त्या बदल्यात ट्रम्प यांनी पाकिस्तानला प्रगत अमेरिकन संरक्षण तंत्रज्ञान म्हणजेच पाचव्या पिढीतील स्टेल्थ जेट आणि आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीचेही आश्वासन देण्यात आले आहे. ट्रम्प यांनी असेही सुचवले की, पाकिस्तानने चीन आणि रशियासारख्या देशांच्या संघटनेपासून दूर राहावे आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सुरक्षा व्यवस्थेचा भाग व्हावे