आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक नियमांमध्ये बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. खरं तर, आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी अनेक नवीन नियम मंजूर केले आहेत. या बदलांमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५ व्या षटकापासून फक्त एकच चेंडू वापरण्याचा नियम समाविष्ट आहे, परंतु याचबरोबर आयसीसीने कसोटी सामन्यांमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू केला आहे. तर कॅचच्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. टी-२० आणि वनडे क्रिकेटमधील नियम येत्या २ जुलैपासून लागू होणार होता. आयसीसीने बदलेल्या नियमांचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे
कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक
टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू केल्यानंतर एक वर्षानंतर, आता आयसीसीने कसोटीतही तो लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटीत स्लो ओव्हर रेट ही एक मोठी समस्या आहे. आता आयसीसीच्या नवीन नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मागील षटक संपल्यानंतर एका मिनिटाच्या आत पुढचे षटक सुरू करावे लागेल. एका मिनिटात जर पुढील षटक सुरू झालं नाही तर त्यांना पंचांकडून दोन वेळा वॉर्निंग दिली जाईल. त्यानंतरही जर १ मिनिटात षटक सुरू झालं नाही तर प्रतिस्पर्धी संघाला पाच धावांचा दंड आकारला जाईल. ८० षटकांनंतर पुन्हा स्टॉप क्लॉक पुन्हा सुरू होईल. हा नियम २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत लागू करण्यात आला आहे.
चेंडूवर लाळेचा वापर केल्यास चेंडू बदलला जाणार नाही, आयसीसीचा नवा नियम काय आहे?
आयसीसीने चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली आहे परंतु मोठा बदल असा आहे की जर पंचांना चेंडूवर लाळ लावल्याचं निदर्शनास आलं तर तो चेंडू बदलला जाणार नाही. हा बदल यासाठी करण्यात आला आहे की संघांनी चेंडू बदलण्यासाठी जाणूनबुजून चेंडूवर लाळेचा वापर करू नये. आता पंच फक्त तेव्हाच चेंडू बदलतील जेव्हा चेंडूचा आकार बदलला जाईल, जसं की चेंडू खूप ओला असेल किंवा त्यात अतिरिक्त चमक असेल. हा निर्णय पूर्णपणे पंच त्यांच्या विवेकबुद्धीनुसार घेतील. जर पंचांना असं वाटत असेल की लाळेच्या वापरामुळे चेंडूमध्ये फारला बदल होणार नाही, तर चेंडू बदलला जाणार नाही.
DRS प्रोटोकॉलमध्ये बदल
आयसीसीने डीआरएस प्रोटोकॉलमध्येही मोठा बदल केला आहे. समजा, एखाद्या फलंदाजाला झेलबाद दिलं गेलं आणि तो खेळाडू जर रिव्ह्यूची मागणी करत असेल. अल्ट्राएजला दाखवलं जात की चेंडू बॅटला स्पर्श न करता पॅडवर आदळला. झेलबाद रद्द झाल्यानंतर, टीव्ही अंपायर मग दुसऱ्या डिसमिसल मोडची तपासणी करतात, जसं की एलबीडब्ल्यू. पूर्वी, जर झेलबाद नसेल असेल तर एलबीडब्ल्यूचा डिफॉल्ट निर्णय “नाबाद” असायचा. पण नवीन नियमानुसार, जेव्हा LBWसाठी बॉल-ट्रॅकिंग ग्राफिक दाखवले जाईल, जर फलंदाज इथे बाद झाल्याचं दिसलं तर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागेल.
फलंदाज बाद झाल्याचे २ अपील
आयसीसीने पंच आणि खेळाडूंच्या रिव्ह्यूच्या प्रक्रियेतही मोठा बदल केला आहे. म्हणजे पूर्वी टीव्ही पंच प्रथम पंच आणि नंतर खेळाडूंचा रिव्ह्यू विचारात घेत असत परंतु नवीन नियमानुसार जर फलंदाज आधीच बाद झाले असेल तर चेंडू डेड होईल. इतर रिव्ह्यूज अजिबात तपासले जाणार नाहीत. उदाहरणार्थ, जर LBW आणि रन आउटसाठी अपील असेल, तर टीव्ही अंपायर प्रथम LBW तपासतील कारण lbw आधी झालं आणि मग रनआऊटचं अपील झालंय. जर फलंदाज आउट झाला असेल तर चेंडू तिथेच डेड होईल.
झेल टिपण्याच्या बाबतीतही मोठा बदल
आयसीसीने कॅचबाबतचा एक मोठा नियमही बदलला आहे. समजा, जर फील्ड पंचांना झेल बरोबर टिपला गेला आहे की नाही हे माहित नसेल, पण टीव्ही पंच सांगतात की तो नो बॉल होता. पूर्वी, नो-बॉल सिग्नल असताना झेलची निष्पक्षता तपासली जात नव्हती. परंतु नवीन नियमांनुसार, आता तिसरे पंच झेलबाद तपासतील. जर झेल योग्य असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला नो-बॉलसाठी फक्त एक अतिरिक्त धाव मिळेल. पण जर झेल बरोबर नसेल तर फलंदाजांने केलेल्या धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला दिल्या जातील.
शॉर्ट रनवर दंड
आयसीसीने शॉर्ट रनबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जाणूनबुजून शॉर्ट रन घेतल्याबद्दल पाच धावांचा दंड आकारला जात होता, परंतु नवीन नियमांनुसार, जर फलंदाजाने जादा धाव चोरण्यासाठी जाणूनबुजून धाव पूर्ण केली नाही, तर पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विचारतील की त्यांना कोणता फलंदाज स्ट्राईकवर असावा असं वाटतंय. याशिवाय, शॉर्ट रन घेणाऱ्या फलंदाजाच्या संघाला निश्चितच पाच धावांचा दंड आकारला जाईल. पण, हे तेव्हाच होईल जेव्हा पंचांना असं वाटेल की फलंदाजाचा हेतू पंचांना फसवणे किंवा धावा काढणे हा नव्हता.
आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५ व्या षटकानंतर एकच नवीन चेंडू वापरण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता डेथ ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत होईल. याशिवाय, आयसीसीने सीमारेषेवर घेतलेल्या झेलबाबतही बदल केले आहेत. जर एखाद्या खेळाडूने सीमेरेषे बहेरून चेंडूला कोणत्याही प्रकारचा स्पर्श केला तर तो बेकायदेशीर मानला जाईल. क्षेत्ररक्षक सीमेबाहेरून फक्त एकदाच चेंडू उसळवून तो पकडू शकतो.