रत्नागिरी – मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. आज पत्रकारितेतील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर फायदेशीर असल्याचे मत प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धीमत्ता, समाजमाध्यम आणि जबाबदार पत्रकारिता विषयावर सिंह यांनी मार्गदर्शन केले. कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या असल्याचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.
ते म्हणाले, मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. पत्रकारितेतील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये लाईव्ह भाषणाचे भाषांतर करता येते, असे सांगून, समाज माध्यमांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा अतिरेक, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले. सत्य तुमच्याकडे आहे, मात्र एआय ला सत्य काय आहे? हे माहीत नसते, असे ही सिंग यांनी सांगितले.यावेळी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले की, कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहॆ. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने, मोठ्या प्रमाणावर बदल दिसत आहॆ. कोकणाला कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक सरस करु. जेणेकरुन कोकण पहायला परदेशी पर्यटक येतील. कोकणची सरसता आणि समृद्धता आणि होत असलेला विकास सर्वदूर पोहोचविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी केले.
यावेळी संचालक (माहिती)(प्रशासन) हेमराज बागुल, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उपसंचालक अर्चना शंभरकर यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी सूत्रसंचलन केले.