राहाता : महाराष्ट्र वारकरी कीर्तनकारांच्या परिषदेचे आळंदी येथे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या सुकाणू समितीवर लोणी येथील वरद विनायक सेवाधामचे महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांची निवड करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायातील संभाव्य कृतिशील उपाययोजनांसाठी महाराष्ट्रातील १२ कीर्तनकारांची समिती स्थापण्यात आली आहे. त्यात उद्धव महाराजांचा समावेश आहे.
वारकरी संप्रदायाची २१ व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची दिशा, स्वरूप, समस्या, आव्हाने व निराकरण व संभाव्य कृतिशील उपाययोजनांसाठी पुण्याच्या ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’च्यावतीने महाराष्ट्रातील १२ कीर्तनकारांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर महंत उद्धव महाराज मंडलिक यांची निवड करण्यात आल्याची माहिती एमआयटी शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी पत्रकाद्वारे दिली.
वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लोककल्याणाचे कार्य, आध्यात्मिक प्रबोधन, लोकजीवनातील दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाधिक कसा उपयोग होईल. याविषयी ही कीर्तनकार परिषद विचारमंथन करणार आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रबोधन कार्य विस्ताराला साह्यभूत होणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. उद्धव महाराज मंडलिक यांच्या निवडीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, जि. प. च्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे आदींनी अभिनंदन केले आहे.