राहाता: शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या प्रकाशन व पुस्तके विभागात विविध भाषांमधील साई सचरित्र ग्रंथ सध्या शिल्लक नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून श्री साई सचरित्र व साईबाबा विषयीचे इतर साहित्य, ग्रंथ शिल्लक नसल्याने साईभक्तांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. साईबाबा संस्थानच्या प्रकाशन विभागाचा कारभार म्हणजे साईभक्तांचा मनस्ताप वाढविणारा असल्याची प्रतिक्रिया साईभक्तांकडून व्यक्त केली जाते.
परप्रांतीय साईभक्तांना आपल्या भाषेतील साई सचरित्र ग्रंथ मिळत नसल्याने संस्थान प्रकाशन विभाग व पुस्तके विक्री केंद्र साई भक्तांच्या दृष्टीने असून अडचण नसून खोळंबा बनले आहे. श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात. दर्शनानंतर घरी परतताना भाविक साईबाबांविषयीचे विविध भाषेतील श्री साई सचरित्र ग्रंथ व इतर लिखित पुस्तके साहित्य संस्थांच्या प्रकाशन विभागात पुस्तक खरेदी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ओडिसी, तेलगू, इंग्रजी यासह इतर काही भाषेतील सतच्चरित्र ग्रंथ शिल्लक नसल्याचे समजते. भाविक खरेदी करण्यासाठी गेले असता सध्या शिल्लक नाही, असे उत्तर भाविकांना ऐकण्याची वेळ येते.
याबाबत स्थानिकांनी चौकशी केल्यानंतर आम्हाला समितीची परवानगी घ्यावी लागते, त्यानंतर खरेदी होते. मागणी नोंदवलेली आहे. अजून ग्रंथ आले नाहीत, असे उत्तर देऊन भक्तांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. साई सचरित्र ग्रंथ भाविकांच्या दृष्टीने पवित्र ग्रंथ आहे. साईबाबांप्रति श्रद्धा अधिक दृढ व्हावी या दृष्टीने देशविदेशातून साई भक्त बाबांच्या भूमीत विविध भाषेतील प्रकाशित केलेले साईग्रंथ घेण्याकरिता उत्सुक असतात. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून साई संस्थान ग्रंथालयात साईचरित्र ग्रंथ उपलब्ध नाही. संस्थान प्रशासनाने भाविकांना साईग्रंथ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी साईभक्तांकडून होत आहे.
संस्थानने दखल घ्यावी
देणगी काउंटरला भक्ताने पंचवीस हजाराचे दान दिल्यावर त्यांना साईचरित्र ग्रंथ मोफत दिला जातो. परंतु साईचरित्र ग्रंथ शिल्लक नसल्याचे कारण सामान्य साईभक्तांना सांगण्यास येते. मी श्री साईबाबा संस्थानच्या प्रकाशन विभागात चौकशी केली असता हिंदी, इंग्लिश, तेलगू, ओडिया या भाषेतील श्री साई सचरित्र ग्रंथ गेली अनेक महिन्यापासून साई भक्तांसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले. यावरून प्रकाशन विभागाचा भोंगळ कारभार निदर्शनास आला. याची दखल संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी घ्यावी. -रमेश गोंदकर, ग्रामस्थ, शिर्डी तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते