सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाटात सायंकाळी मालट्रकला अचानक लागलेल्या आगीत ट्रक त्यातील साहित्यासह खाक झाला. या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शकील आलम हा चालक मालट्रक (केए०१ एक्यू०५५७) घेऊन मुंबईहून बंगळूरकडे जात होता. या ट्रकमध्ये प्रदर्शनात वापरले जाणारे साहित्य होते.

खंबाटकी घाटातून जात असताना, अचानक ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालक शकील आलम आणि साहित्याचा मालक अमन कुमार यांनी तातडीने ट्रकबाहेर उड्या मारल्या. त्यांनी अग्निरोधक यंत्राच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाऱ्यामुळे आगीने मोठा भडका उडाला आणि वाहन व त्यातील साहित्य पूर्णपणे खाक झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच खंडाळ्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मस्के आणि महामार्ग सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब वंजारे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. एशियन पेंट आणि वाई पालिकेच्या बंबांनी आग आटोक्यात आणली. आगीमुळे खंडाळ्याच्या बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाल्याची माहिती उपनिरीक्षक संतोष मस्के यांनी दिली.