Air India Plane Crash : १२ जून रोजी झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनानंतर गौरव तनेजा या घटनेबद्दल रोज नवीन अपडेट्स देत आहे. गौरवने याआधीच्या एका व्हिडीओमध्ये सांगितले होते की, हा अपघात इंजिन बिघाडामुळे झाला असावा. त्यानंतर त्याने ओव्हरलोडिंग हेदेखील या अपघाताचे कारण असू शकतं, असा अंदाजही वर्तवला. आता त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की, कदाचित वैमानिकाने चुकीचे इंजिन बंद केले असेल आणि त्यामुळे विमान कोसळले असेल.
एअर इंडिया १७१ विमान उड्डाणानंतर काही क्षणातच मेडिकल कॉलेजमध्ये कोसळण्याचे कारण पायलटची चूक असू शकते असं गौरवने सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल गौरव म्हणाला, “विमानाच्या टेकऑफच्या व्हायरल व्हिडीओमध्ये विमानाने उड्डाण केले तेव्हा धुळ दिसत आहे. विमानाने धावपट्टीच्या शेवटच्या टोकावरून टेकऑफ केले. व्हिडीओमध्ये विमानाला जास्त वेळ धावपट्टीवरून जावं लागलं आणि टेकऑफ केल्यानंतर लगेच वेग कमी झाल्याचे दिसत आहे.”
गौरव तनेजाने पुढे असं सांगितलं, “एका इंजिनामधील बिघाडानंतरही विमानाने अपेक्षेपेक्षा जास्त वेळ धावपट्टीवर घेतला असावा. इंजिनमध्ये बिघाड झाला तेव्हा वैमानिकांनी टेकऑफ करण्याचा निर्णय आधीच घेतल्यामुळे त्यांच्याकडे मागे वळण्याचा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. विमानाच्या दोन्ही इंजिनांमध्ये जर बिघाड असता, तर विमानाने उड्डाण घेतलंच नसतं.”
“इंजिन बिघाड आणि टेकऑफला झालेला उशीर यामुळे वैमानिक तणावात होते : गौरव तनेजा
पुढे गौरव म्हणाला, “विमान जितकं जड असेल तितकं जास्त इंधन जळतं. विमानात जास्त वजन असेल आणि धावपट्टीवर एक इंजिन निकामी झाले असेल. यामुळे वैमानिकांना विमान उड्डाण का घेत नाही असा प्रश्न पडला असेल. इंजिन बिघाड आणि उड्डाणाला झालेला उशीर यामुळे ते आधीच तणावात होते. त्यात ते खराब झालेल्या इंजिनसह ते १००-१५० फूट वर गेले आणि लँडिंग गिअर वर खेचायला विसरले.”
विमान वर आणण्यासाठी प्रयत्न केला गेला, परंतु ते एका इमारतीवर आदळले : गौरव तनेजा
पुढे त्यांनी सांगितलं, “जेव्हा ते विमान ४०० फूट उंचीपर्यंत पोहोचलं. पण एक इंजिन निकामी झाल्यामुळे टेकऑफ उशिरा झाला. त्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही. या विमानाच्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, त्यांच्याकडून विमान वर आणण्यासाठी प्रयत्न केला गेला, परंतु विमान एका इमारतीवर आदळले आणि यानंतर मोठी दुर्घटना घडली, जी इतिहासातील सर्वात विमान दुर्घटना आहे.”