Veteran Producer Talks About Akshay Kumar : अक्षय कुमार बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्यानं त्याच्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अक्षयनं त्याच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. अभिनेत्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. परंतु, नुकतंच बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध निर्मात्यानं अभिनेत्याबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यांनी एका मुलाखतीमधून अक्षय कुमार आणि बॉलीवूडमधील कलाकारांबद्दल खुलासा केला आहे.

अक्षय कुमार व अभिनेत्री करीना कपूर यांनी २००२ साली आलेल्या ‘तलाश’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट त्या वेळच्या सर्वाधिक बजेट असलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनील दर्शन यांनी केलं होतं आणि निर्मिती पहलाज निहलानी यांनी केली होती. अशातच आता पहलाज यांनी अक्षय कुमारनं चित्रपटात करीना कपूरची निवड करण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरल्याचं म्हटलं आहे.

पहलाज निहलानी यांनी ‘लर्न फ्रॉम द लीजेंड’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अक्षय कुमार, तसेच बॉलीवूडमधील कलाकारांच्या वाढत चाललेल्या अनावश्यक मागण्यांबद्दल वक्तव्य केलं आहे. पहलाज म्हणाले, “पूर्वी दिग्दर्शक व निर्माते चित्रपटासाठी कलाकारांची निवड करयाचे. परंतु, आता सगळं बदललं आहे. आता कलाकार बऱ्याचदा यामध्ये त्यांची मतं मांडत असतात, हस्तक्षेप करतात”. यावेळी त्यांनी अक्षय कुमारचं उदाहरण देत सांगितलं, “पहिल्यांदाच अक्षय कुमारनं चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये हस्तक्षेप केला होता. त्यानं ‘तलाश’ चित्रपटासाठी माझ्याकडे करीना कपूरच्या नावाचा आग्रह धरला होता”.

पहलाज पुढे म्हणाले, “अक्षयनं सांगितलं होतं. आपण उद्यापासून चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करू शकतो. तुम्हाला मला द्यायचेत तेवढे पैसे द्या; पण या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका करीना कपूरच साकारणार. हा त्यावेळी सर्वांत बिग बजेट चित्रपट होता. या चित्रपटाचं बजेट तब्बल २२ कोटी इतकं होतं. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच असं घडलं होतं, जिथे कलाकारानं चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये हस्तक्षेप केला होता”.

पहलाज पुढे असंही म्हणाले, “बऱ्याचदा वय झाल्यानंतर अभिनेत्यांना तरुण अभिनेत्रींसह काम करायचं असतं. कारण- त्यांना असं वाटतं की, त्यामुळे स्क्रीनवर त्यांचं वय कमी दिसेल. सध्या इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीनं काम केलं जातं. ती पद्धत खूप वेगळी आहे. कलाकारांच्या खूप अनावश्यक मागण्या असतात”. निर्माते पहलाज निहलानी कलाकारांच्या अनावश्यक मागण्यांबद्दल पुढे म्हणतात, “पूर्वी जे काम एक माणूस करायचा, आता त्यासाठी १० माणसांची नेमणूक केली जाते. पूर्वी कलाकारांसाठी फक्त एक व्हॅनिटी व्हॅन असायची; पण आता प्रत्येकाला सहा व्हॅनिटी व्हॅन लागतात. एक व्हॅन व्यायामासाठी, एक किचनसाठी, एक आराम करण्यासाठी… अशा मागण्या करणाऱ्या कलाकारांना लाज वाटायला हवी”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलाज पुढे कलाकारांच्या मेकअपमनबद्दल म्हणाले, “पूर्वी एका कलाकाराबरोबर फक्त एकच मेकअपमन असायचा. आता एक वेगळा हेअर ड्रेसरही असतो आणि त्यामुळे एक ते दीड लाख रुपयांचा खर्च सहज वाढतो. पूर्वी कलाकार घरचं जेवण बनवून आणत असे; पण आता त्यांना डाएट फूड लागतं. सकाळी डाएट फूड आणि रात्री ड्रग्ज.”