Parag Tyagi last moments with Wife Shefali Jariwala: ‘कांटा लग गर्ल’ शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शुक्रवारी, २७ जूनच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. शेफालीला पती परागने रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफालीवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आता तिच्या अंत्यसंस्कारातील काही हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
शेफाली जरीवाला ही अभिनेता पराग त्यागीची बायको होती. शेफालीवर मुंबईतील ओशिवारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिला अखेरचा निरोप देण्याआधीचा स्मशानभूमीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पराग व शेफालीची आई सुनीता जरीवाला आक्रोश करताना दिसत आहेत.
पराग व त्याच्या सासूबाई शेफालीच्या पार्थिवाजवळ बसलेले व्हिडीओत दिसतात. पराग शेफालीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. त्यानंतर बराच वेळ तो शेफालीच्या पार्थिवाशी बोलत असतो. तर, शेफालीची आई लेकीच्या पार्थिवावर हात ठेवून सून्न अवस्थेत बसलेल्या दिसतात. इन्स्टंट बॉलीवूडने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पाहा व्हिडीओ-
या व्हिडीओवर चाहत्यांनी तसेच कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. हे पाहणं किती वेदनादायी आहे, अशी कमेंट अभिनेत्री दिशा परमारने केली आहे. तर, यामिनी मल्होत्रानेही हे खूप वेदनादायी असल्याचं म्हटलं आहे. परागने शेफालीच्या कपाळावर किस केलं ते पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. ज्या पद्धतीने पराग तिच्या पार्थिवाजवळ बसलाय, तिला किस करतोय ते पाहून त्याचं तिच्यावर किती प्रेम होतं, ते दिसून येतंय अशा आशयाच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

दरम्यान, ‘कांटा लगा’ या गाण्यातून लोकप्रियता मिळणाऱ्या शेफाली जरीवालाने बिग बॉस १३ मध्ये भाग घेतला होता. तसेच ती परागबरोबर नच बलिये या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. तिने सलमान खान, अक्षय कुमार व प्रियांका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘मुझसे शादी करोगी’ सिनेमातही काम केलं होतं.
शेफाली जरीवालाचं पहिलं लग्न गायक हरमीत सिंगशी झालं होतं, पण ५ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या आयुष्यात पराग आला. दोघांनी एकमेकांना चार वर्षे डेट केलं आणि २०१४ मध्ये लग्न केलं. पराग व शेफाली १५ वर्षांपासून एकत्र होते. पराग व शेफालीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आता शेफालीच्या आकस्मिक निधनामुळे पराग पूर्णपणे खचला आहे.