प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेला ‘ठग लाईफ’ हा चित्रपट येत्या ५ जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्यांच्यासह अभिनेत्री त्रिशा कृष्णन महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी यापूर्वी जरी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असलं तरी या चित्रपटातून पहिल्यांदाच त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अशातच नुकतंच यातील अभिनेता एस.टी.आर (सिलंबरसन) याने मणिरत्नम व कमल हासन यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. ‘ठग लाईफ’मध्ये सिलंबरसन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये अभिनेत्याने त्यांच्याबद्दलचा हा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला, “चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी मी कमल हासन यांची मान आवळून त्यांना मारणं अपेक्षित होतं. हा सीन माझ्यासाठी प्रचंड कठीण होता. मणिरत्नम व कमल हासन या दोघांनाही निराश न करता त्यांना अपेक्षित असलेलं काम करणं भाग होतं.”

पुढे सिलंबरसन म्हणाला, “मी प्रचंड गोंधळलो होतो. मला कळत नव्हतं कमल हासन सर इतके प्रभावी सीन करत आहेत की माझ्यामुळे त्यांना त्रास होत आहे. जर मी हे केलं नाही तर मणिरत्नम सर ओरडतील आणि जर खरंच सीनदरम्यान माझ्याकडून काही चुकलं आणि त्रास झाला तर कमल हासन सर रागावतील, त्यामुळे मी गोंधळलो होतो. परंतु, तो सीन पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता सिलंबरसनबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आजवर ‘पथु थळा’, ‘वेंधु थानिंधु काडू’, ‘ईश्वरन’, ‘वंथा राजवथान वारुवेन’, ‘वालु’, ‘डोंगाटा’, ‘महा’, ‘ये माया चेसावे’, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर तो फक्त अभिनेता नसून गीतकर, संगीतकार, दिग्दर्शक आणि गायकसुद्धा आहे. त्याची ‘कुट्टीपायले’, ‘लूसु पेने’, ‘मनमाधने नी’ ‘ओरू थलाई रागम’, ‘कथागा’, ‘कन्ने उन कधल’, ‘अप्पन मवाने वादा’ यांसारखी अनेक गाणी प्रसिद्ध आहेत.