Marathi Actress Asha Shelar : ‘झी मराठी’ वाहिनीवर तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेल्या ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने एकेकाळी अधिराज्य गाजवलं होतं. २०१३ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने २०१६ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरी, आजही या मालिकेच्या आठवणी सर्वांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधानने जान्हवी ही भूमिका साकारली होती.
मालिकेत जान्हवीच्या सावत्र आईचं नाव शशिकला होतं. जान्हवीला सतत घालून-पाडून बोलणारी, पैशांसाठी वाटेल त्या थराला जाणारी शशिकला या मालिकेची खलनायिका होती. मालिकेत ही भूमिका अभिनेत्री आशा शेलार यांनी साकारली होती.
‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरांत पाहिली जायची. त्यामुळे साहजिकच शशिकलाची भूमिका साकारणाऱ्या आशा शेलार सुद्धा सर्वत्र प्रसिद्धझोतात आल्या होत्या. शशिकला हे निगेटिव्ह शेडचं पात्र होतं. ही भूमिका आशा शेलार यांनी उत्तमरित्या साकारली होती. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेनंतर त्या ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत झळकल्या होत्या. ‘छत्रीवाली’, ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’, ‘पिंकीचा विजय असो’ अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी गेल्या काही वर्षांत काम केलं.
आता या लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘झी मराठी’ची नवीन मालिका ‘कमळी’ यामध्ये आशा शेलार महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. नव्या प्रोमोमध्ये त्यांच्या जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे.
नव्या मालिकेत आशा शेलार यांच्या भूमिकेचं नाव काय असेल हे अद्याप समोर आलेलं नाही. ही मालिका ३० जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने विजया बाबर आणि निखिल दामले यांची फ्रेश जोडी सर्वांना ऑनस्क्रीन पाहायला मिळेल.

दरम्यान, ‘कमळी’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, ही मालिका ३० जूनपासून रात्री ९ वाजता ऑन एअर होईल. यामध्ये आशा शेलार यांच्यासह विजया बाबर, निखिल दामले, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे, योगिनी चौक हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.