Marathi Actress Kashmira Kulkarni : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. या मालिकेत मृणाल दुसानीस, ज्ञानदा, विवेक सांगळे, विजय आंदळकर, ऋजुता कुलकर्णी अशी जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत रम्या ही खलनायिकेची भूमिका अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी साकारत आहे.
कश्मिराने नुकतीच ‘राजश्री मराठी’च्या ‘तिची गोष्ट’ या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने तिच्या जन्माचा व नावामागचा खास किस्सा चाहत्यांना सांगितला.
कश्मिराचा जन्म सिनेमागृहात झालाय, याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली “माझी आई गरोदर होती आणि माझ्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा त्याचदरम्यान होता. त्यामुळे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्या दोघांनी सिनेमाला जायचं ठरवलं होतं. पण, त्याचवेळी माझ्या आईला काश्मीरला जायचं होतं. अर्थात, आई गरोदर असल्याने डॉक्टरांनी प्रवास करण्याचा सल्ला दिला नव्हता. म्हणून मग ते दोघं सिनेमाला गेले होते.”
“त्यावेळी ‘नाचे मयूरी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यादरम्यान आईला प्रसुतीकळा सुरू झाल्या आणि माझा सिनेमागृहात जन्म झाला. आई-बाबांना तेव्हा काश्मीरला जाता आलं नाही म्हणून आणि सिनेमा पाहताना माझा जन्म झाला… हा सगळा विचार करून आईने माझं नाव कश्मिरा ठेवलं. सिनेमागृहात जन्म झाल्याने ही हिरोईन होणार असं आईने आधीच ठरवलं होतं आणि पुढे ही हिरोईन झाली तर कश्मिरा हे नाव शोभेल हा सुद्धा विचार करून तिने माझं नाव ठेवलं होतं.” असं अभिनेत्रीने सांगितलं.
कश्मिराला समाजकार्याची आवड आहे. नुकतीच पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन अभिनेत्री वारकऱ्यांची सेवा करताना दिसली. याबद्दल कश्मिरा सांगते, “माझ्या आईची इच्छा होती की, मी अभिनय क्षेत्रात काम केलं पाहिजे. माझी अशी इच्छा कधीच नव्हती. मला बिझनेस आणि समाजकार्यात फार रस आहे.”
दरम्यान, कश्मिराने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. वर्षभरापूर्वी तिने ‘कलर्स मराठी’च्या ‘काव्यांजली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. सध्या अभिनेत्री ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत रम्या हे पात्र साकारत आहे.