Marathi Actress Modeling Experience : झी मराठी वाहिनीवर काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. सूर्यादादा आणि त्याचं बहिणींशी असलेलं खास नातं प्रेक्षकांना आवडत आहे. शिवाय सूर्या आणि तुळजा ही जोडीही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून तुळजाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा परदेशीने अवघ्या काही दिवसांत प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली; मात्र आजाराच्या कारणास्तव तिने या मालिकेतून एक्झिट घेतली. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या दिशाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे. यादरम्यान तिला काही वाईट प्रतिक्रिया सहन कराव्या लागल्या.

याबद्दल दिशाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. दिशाने ‘मराठी मनोरंजन विश्व’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करत असतानाच्या वाईट प्रतिक्रियांबद्दल सांगितलं आहे. याबद्दल दिशा म्हणाली, “मी कथ्थक नृत्य करणारी मुलगी होते. त्यानंतर मी मॉडेलिंग या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मॉडेलिंग काय असतं हे लोकांना माहिती नव्हतं.”

यापुढे दिशाने सांगितलं, “तेव्हा इन्स्टाग्राम नव्हतं, सोशल मीडिया नव्हता आणि गूगलवर याबद्दल फार कमी माहिती होती. त्यामुळे मॉडेलिंग या क्षेत्राबद्दल लोक अभ्यासू नव्हते, पण आता चित्र बदललं आहे. माझ्या बिल्डिंगमध्येच शंभरहून अधिक फोटोग्राफर आणि दहा-पंधरा मॉडेल असतील. पण, माझ्यावेळी माझ्या परिसरात एखाद दुसरी मॉडेल असेल. तेव्हा मी मॉडेलिंग करते म्हणजे नक्की काय करते हे लोकांना कळायचं नाही.”

अभिनेत्री दिशा परदेशी इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर दिशा म्हणते, “आपल्याकडे मॅगझिन्सचं वेड नाही. पण, तेव्हा मी मॅगझिन्ससाठी शूट करायचे; म्हणूनच मी काय काम करते आहे हे लोकांना माहीतच नसायचं, त्यामुळे तेव्हा माझ्याबद्दल अनेक वाईट अफवा होत्या. तेव्हा माझं काम दिसायचंच नाही. मी अभिनय केला तर तो चित्रपट किंवा मालिकांमधून दिसला असता, नाटक करत असते तर बातमी आली असती, पण मॉडेलिंगबद्दल सर्वसामान्य घरात काही कळतच नाही.”

यापुढे दिशा म्हणते, “एखाद्या जाहिरातीत दिसलं तर कळतं, पण मग बाकीच्या वेळी मी काय करते? कुठे जाते? रात्री इतक्या उशिरा येते मग मी कुठे जाते? रात्रीची शिफ्ट आहे? रात्रीचं कुठे फोटोशूट करते? हे सतत होत होतं. तेव्हा मी माझ्याबद्दलच्या अनेक वाईट अफवा ऐकल्या आहेत. तेव्हा मला या सगळ्याचा इतका त्रास झाला होता की, मी एक वर्ष घरी बसले होते. मी खूप नैराश्येत होते. तेव्हा मला आई-बाबांनी समजावलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर दिशा असं म्हणाली, “तेव्हा माझी आई जॉब करत होती, त्यामुळे तेव्हा आईने तिच्या जॉबवरील काही प्रसंग सांगून माझी समजूत काढली. मी आणि माझे आई-बाबा लोकांना सांगून सांगून थकलो होतो. मग एक वेळ अशी आली की, मी या सर्वांकडे दुर्लक्ष केलं. मी देवाचे आभार मानेन की, या सगळ्यात आई-बाबा कायम माझ्याबरोबर होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या आई-बाबांनी माझ्यावर कायमच विश्वास ठेवला आहे.”