‘बडे अच्छे लगते है’ मालिकेत मुख्य भूमिका साकारून राम कपूरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. रामने अनेक मालिका, चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा त्याने उमटवला आहे. राम कपूर आता आधीप्रमाणे फार काम करत नाही, तरीही तो कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. माझ्या पुढच्या चार पिढ्या बसून खातील, इतका पैसा कमावला आहे असं रामने म्हटलं होतं. रामने आता गुंतवणुकीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.
राम कपूरने भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांना मुलाखत दिली. यात त्याने गुंतवणूक आणि संपत्तीबद्दल सांगितलं. रामचे वडील अनिल ‘बिली’ कपूर होते. त्यांचं जाहिरात क्षेत्रात मोठं नाव होतं. बँकेत पैसे ठेऊन काहीच फायदा नसल्याचं रामने म्हटलंय. तसेच योग्य वेळी योग्य गुंतवणूक करण्याचे महत्त्व त्याने सांगितले. अभिनय करून खूप पैसा कमावला असला तरी अभिनय करायला आवडतं म्हणून काम करत असल्याचं रामने स्पष्ट केलं.
गुंतवणुकीमुळे श्रीमंत होता येतं – राम कपूर
राम कपूर म्हणाला, “माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी पैशांसाठी खूप कष्ट करायचो. एकदा पैसे कमावल्यावर मग मी ते काम आवडतं म्हणून करू लागलो. आता तर मी फक्त जेव्हा मला काम करावं वाटतं तेव्हाच काम करतो, नाहीतर सलग सहा महिने मी काहीही करत नाही. या काळात, मी गुंतवणूक आणि मालमत्तेसंदर्भातील कामे करतो. दुबईमध्ये माझी मालमत्ता आहे. गुंतवणूक तुम्हाला जास्तीत जास्त श्रीमंत बनवते. जेव्हा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात करता आणि तुम्ही त्याबद्दल सेन्सिबल असता तेव्हा तुम्हाला त्या पैशांचं काय करायचंय, हे माहीत असायला पाहिजे. कारण ते खूप महत्वाचं आहे.”
पैसे बँकेत ठेऊन काहीच फायदा नाही- राम
रामने गुंतवणूक करून गुंतवलेल्या पैशांत वाढ करण्याबद्दल त्याचं मत मांडलं. “जर तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर तुमच्याकडे इतके पैसे असतील ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. त्यासाठी तुम्ही नीट डोकं लावायला हवं. तसेच तुम्हाला सल्ला देणारे योग्य लोक चांगले असले पाहिजेत. पैसे कमवणे हा फक्त पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा म्हणजे तुम्ही त्या पैशाचे काय करता. बँकेत पैसे ठेवून काहीच फायदा नसतो, तुम्हाला त्याचं काय करायचंय हे माहित असलं पाहिजे. ते माहीत असेल तर तुम्ही दर तीन वर्षांनी तुमचे पैसे दुप्पट करू शकता,” असं राम कपूर म्हणाला.
ह्युमन्स ऑफ बॉम्बेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राम म्हणाला की त्याने त्याच्या पुढच्या चार पिढ्या आरामात जगू शकतील, इतके पैसे कमावले आहेत. “घड्याळे आणि कार या मला सर्वाधिक आवडणाऱ्या गोष्टी आहे. ज्या लोकांना ही घड्याळे परवडतात त्यांच्याकडे घड्याळांचे उत्तम कलेक्शन असतो. ज्यांच्याकडे ती असतात त्यांना त्याबद्दल बोलायला आवडत नाही, खरं तर मलाही त्याबद्दल बोलायला आवडत नाही, पण मी सेलिब्रिटी असल्याने मीडियाला त्याबद्दल माहिती मिळतेच. हो, माझ्याकडे कारचे कलेक्शन आहे. माझ्याकडे फेरारी, पोर्श आहे पण या गोष्टी शो ऑफ करायला आम्हाला आवडत नाही,” असं राम कपूर म्हणाला.