Zee Marathi Serial Kamali : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही महिन्यांत नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘कमळी’ मालिकेची पहिली झलक वाहिनीने प्रेक्षकांबरोबर शेअर केली होती. यावेळी अभिनेत्री विजया बाबर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, या मालिकेची अन्य स्टारकास्ट वाहिनीने गुलदस्त्यात ठेवली होती.

‘कमळी’ या ‘झी मराठी’च्या नव्या कोऱ्या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. अखेर मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये संपूर्ण स्टाकास्ट, मालिकेच्या प्रसारणाची वेळ, तारीख सर्वकाही जाहीर करण्यात आलेलं आहे.

‘कमळी’ ही खेडेगावातील मुलगी असते. त्यामुळे आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी, घरातील खर्च भागवण्यासाठी कमळी एका पार्टीमध्ये वेट्रेस म्हणून काम करायला येते. यावेळी या पार्टीत चुकून तिची धडक या मालिकेच्या नायकाशी होते. यामध्ये मुख्य नायकाची भूमिका ‘बिग बॉस मराठी’ फेम लोकप्रिय अभिनेता निखिल दामले साकारत आहे. यापूर्वी तो ‘कलर्स मराठी’च्या ‘रमा राघव’ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला होता.

पुढे, या पार्टीत अनिका ( अभिनेत्री केतकी कुलकर्णी ) कमळीचा अपमान करते. भर पार्टीत अपमान होऊन सुद्धा कमळी समजूतदारपणा दाखवते आणि तिचा हा मोठेपणा पाहून कुटुंबप्रमुख असलेल्या इला भाटे ( आजी ) भारावून जातात. ही पार्टी या मालिकेतील आजींनी त्यांच्या हरवलेल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली असते. याच आजींची भूमिका मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे साकारत आहेत. खरंतर, ‘कमळी’ हीच मालिकेत इला भाटेंची नात असते. पण, राजघराण्यात जन्म होऊनही ती कशी हरवली, मालिकेचा नेमका ट्विस्ट काय असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.

विजया बाबर, निखिल दामले, केतरी कुलकर्णी, योगिनी चौक, इला भाटे, आशा शेलार, अनिकेत केळकर, सुष्मा मुरुडकर अशी जबरदस्त स्टारकास्ट ‘कमळी’ मालिकेत झळकणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कमळी’ मालिका येत्या ३० जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या मालिकेला प्रेक्षक कसे प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.