Rs 639 crore for 2 duplexes in Mubai worali : मुंबईतील घरांच्या किमती याबद्दल आपण सातत्याने ऐकत असतो, आज पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. यामागील कारण म्हणजे मुंबईतील लक्झरी रिअल इस्टेट बाजारात आणखी एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. वरळी येथील दोन सी-फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंट हे तब्बल ६३९ कोटींना विकले गेले आहेत.
विशेष बाब म्हणजे, हा व्यवहार भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा रेसिडेंशियल अपार्टमेंट विक्रीचा व्यवहार ठरला आहे ठरली आहे. एकूण २२,५७२ चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे अपार्टमेंट वरळी सी फेसवरील Naman Xana या ४० मजली इमारातीत आहेत.
कोणी विकत घेतले?
एका फार्मा कंपनीच्या चेअरमन लीना गांधी तिवारी यांनी हे ३२व्या आणि ३५व्या मजल्यावरील दोन अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट विकत घेतले आहेत. कार्पेट एरियाच्या आधारावर याची किंमत २.८३ लाख प्रति चौरस फूट इतकी प्रचंड आहे.
एकूण ७०३ कोटी रुपये खर्च
कागदपत्रांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, तिवारी यांनी हे दोन अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी तब्बल ६३.९ कोटी रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी म्हणून खर्च केले आहेत. यामुळे या व्यवहाराचे मूल्य ७०३ कोटी रुपयांच्या जवळपास पोहचले आहे.
दक्षिण-मध्य मुंबईतील वरळी येथील सी-फेसिंगचा भाग हा हा लक्झरी गृहप्रकल्पांचे केंद्र बनत चालला आहे. येथून दिसणारा अरेबियन समुद्राचा नजारा आणि वांद्रे,नरिमन पॉइंटच्या जवळ असल्याने येथे रिअल इस्टेटच्या किमती इतक्या जास्त आहेत. तसेच आगामी काळात येथे होणाऱ्या कोस्टल रोड आणि सी-लिंक एक्सटेंशनमुळे वरळी हे देशभरातील उच्चभ्रू लोकांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण ठरत आहे.
या महिन्याच्या सुरूवातीलाच बँकर उदय कोटक यांनी वरळी येथील एक अख्खी सी-फेसिंग इमारत विकत घेतल्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यांनी या इमारतीसाठी ४०० कोटी रुपये मोजले आहेत. गेल्या काही महिन्यात मुंबईतील रिअल इस्टेट बाजारात विशेषतः लक्झरी श्रेणीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. एप्रिल २०२४ मध्ये शहरात आजवरची सर्वाधिक मालमत्ता नोंदणी झाली होती.