मुंबई : मुंबई विमानतळावर एका वाहनचालकाने सुरक्षा रक्षकाला धडक देत १२ मीटर अंतरावर फरफटत नेल्याची घटना घडली. या सुरक्षा रक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. विमानतळ पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई विमानतळावर क्रिस्टल सिक्युरीटी कंपनी सुरक्षा व्यवस्थेचे काम पाहते. कंपनीचे दोन सुरक्षा रक्षक अफ्रोज सिद्दीकी आणि संतोष यादव हे दोघे टर्मिनल १ च्या आगमन परिसरात तैनात होते. गुरूवारी दुपारी १.३० च्या सुमारास ते या परिसरातील वाहतूकीचे नियमन करीत होते. तेथील एका वळणावर वाहनचालकाने आपले वाहन उभे करून रस्ता अडवला होता. सुरक्षा रक्षक सिद्दीकी यांनी त्या वाहनचालकाला वाहन बाजूला घेण्याची विनंती केली. मात्र त्याने आपले वाहन हटवले नाही. त्यानंतर काही वेळाने सिद्दीकी यांनी पुन्हा त्याच्याकडे जाऊन वाहन हटविण्यास सांगितले. मात्र वाहनचालक ऐकायला तयार नव्हता. त्याने सिद्दीकी यांच्याशी वाद घालायला सुरवात केली. त्यामुळे सिद्दीकी यांनी आपला सहकारी संतोष यादव याला बोलावून घेतले. ते पाहून वाहन चालक संतापला आणि त्याने वाहन बाजूला नेले. परंतु काही क्षणातच त्याने वाहन सिद्दीकी यांच्या अंगावर घातले. तेवढ्यावरच न थांबता त्याने वाहनाने सिद्दीकी यांना १० ते १२ मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. हा प्रकार पाहून एकच गोंधळ उडाला. त्यानंतर वाहनचालकाने ब्रेक दाबल्याने सिद्दीकी खाली पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात आसलेल्या या वाहनचालकाने अन्य दोन वाहनांना धडक दिली. अन्य सुरक्षा रक्षक आणि तेथे उपस्थित नागरिकांनी वाहनचालकाला पकड़ून विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मद खली असे त्या वाहनचालकाचे नाव असून तो वडाळा येथे राहणारा आहे. त्याच्या विरोधात बेदरकारपणे वाहन चालवून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (ब), भरधाव वेगाने वाहन चालविल्याप्रकरणी कलम २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी सिद्दीकी यांच्यावर सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.