मुंबई : महायुती सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून तिसऱ्या भाषेची केलेली सक्ती आणि त्यातही हिंदीची सक्ती गैर असल्याची भूमिका समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांंनी घेतली आहे. या निर्णयाला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र ५ जुलै रोजी मराठीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूनी मोर्चाची हाक दिली असून त्याला राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसने देखील पाठिंबा दिलेला आहे. मात्र मोर्चात सहभागी व्हायचे की नाही याबाबत अजून समाजवादी पक्षाचा निर्णय झालेला नाही. महायुती सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेची केलेली सक्ती गैर असल्याचे मत रईस शेख यांनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले, हिंदी भाषेला समाजवादी पक्षाचा विरोधी नाही. राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी व इंग्रजी या पहिलीपासूनच्या सक्तीच्या दोन भाषा आहेत. आता हिंदी ही तिसरी भाषा म्हणून महायुती सरकारने सक्ती लादली आहे. पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला आमचा विरोध आहे. मात्र जर सरकारला हिंदी भाषा शिक्षणात आणायची असल्यास ती इयत्ता पाचवी पासून करण्यात यावी, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.
संघ परिवाराचा अजेन्डा..
ते पुढे म्हणाले की, यासंदर्भात समाजवादी पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. तिसरी भाषा लादण्याचा संघ आणि भाजपचा अजेंडा आहे. विरोधी पक्षांनी राज्यात हिंदीची पहिलीपासून सक्ती करण्याच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. त्याला आपला पाठिंबा आहे. त्यामुळे ५ जुलै रोजी होणाऱ्या मराठी भाषेसाठीच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आमदार रईस शेख यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष मोर्चात
दरम्यान, हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात काँग्रेस सहभागी होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी नुकतेच स्पष्ट केले. या मुद्यावर सर्व पक्ष, संस्था, साहित्यिक आणि मराठी प्रेमींचा एकच मोर्चा निघावा अशीच काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणाले. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही मोर्चाला पाठिंबा दिला असून प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही केले आहे.