चंद्रपूर : राज्यात सध्या शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळा चर्चेत आहे. असाच घोटाळा दीड वर्षांपूर्वी कोरपना तालुक्यातही समोर आला होता. नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयात सहायक शिक्षिकेची बोगस भरती केल्याप्रकरणी संस्था सचिव तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल मुसळे यांच्यासह संबंधित सहायक शिक्षिकेविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, राजकीय दबावामुळे गडचांदूर पोलिसांनी याप्रकरणी अद्याप न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाच्यावतीने हे विद्यालय संचालित केले जाते. संंस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक मुसळे यांनी विद्यालयात योगिता चरणदास शेडमाके यांची सहायक शिक्षिकापदी भरती केली. बनावट दस्ताऐवज सादर करून ही भरती करण्यात आली. याप्रकरणी कोरपना पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी यांच्या तक्रारीवरून ३ ऑक्टोबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दीड वर्षे लोटल्यानंतरही न्यायालयात याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना ९० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे लागते. मात्र, लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे गडचांदूर पोलीस यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागली आहे.

मुख्याध्यापक अन् जिल्हा बँकेत लिपिकही

मुख्याध्यापक मुसळे हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदावर कार्यरत होते. एकाच वेळी त्यांनी शैक्षणिक संस्था व जिल्हा बँक, अशा दोन्ही ठिकाणाहून वेतन घेत शासनाची फसवणूक केल्याचीही तक्रार आहे. शिक्षण विभागाने बँकेला पत्र देऊन सविस्तर माहिती मागितली आहे. याप्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे सुनावणी सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सखोल चौकशीची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यात बोगस शिक्षक भरतीची अनेक प्रकरणे आहेत. या प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, सहायक शिक्षिका योगिता चरणदास शेडमाके हिच्या नियुक्तीची सत्यप्रत तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशा आशयाचे पत्र गडचांदूरचे पोलीस उपनिरीक्षक तथा चौकशी अधिकारी प्रितम पिंपळकर यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पाठवले आहे.