नवी मुंबई : मुंबई एपीएमसी फळ बाजारात सध्या डाळिंबाची आवक वाढली आहे. मात्र दर्जेदार फळांच्या टंचाईमुळे दरांनी चांगलाच उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, पुणे या प्रमुख भागांतून बाजारात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची आवक होत असली, तरी उच्च प्रतीचे फळ मर्यादित असल्याने ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेसाठी अधिक किंमत मोजावी लागत आहे.
सध्या एपीएमसीच्या घाऊक फळ बाजारात ३०० ते ५०० ग्रॅम वजनाच्या दर्जेदार डाळिंबासाठी २५० ते ३५० रुपये किलो पर्यंत दर आकारले जात आहेत. तर सामान्य दर्जाचे डाळिंब ६० ते १०० रुपये किलो दराने विकले जात आहे. याचा परिणाम किरकोळ बाजार भावातही दिसून येत आहे. त्यामुळे दर्जेदार फळ सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
सुधारित वाण, संरक्षित शेती, हरितगृह पद्धती, हॉर्मोन फवारण्या अशा नव्या शेती पद्धतींमुळे पावसाळ्यातही डाळिंबाचे उत्पादन चांगले होत असून, बाजारात आवक वाढली आहे. मात्र उत्तम दर्जाचे डाळिंब बाजारात पोहोचण्यासाठी अजून १५ ते २० दिवस लागतील, असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
एपीएमसीच्या घाऊक फळ बाजारात डाळिंबाची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत २०–२५ टक्क्यांनी वाढली आहे. मंगळवारी बाजारात तब्बल ११३१ क्विंटल डाळिंबाची आवक नोंदवण्यात आली. मात्र, या वाढलेल्या मालात सुधारित गुणवत्ता असलेले फळ तुलनेने कमी आहे. यामुळे ग्राहकांना चांगल्या फळासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
बाजारात डाळिंबाची आवक वाढली असली तरी उत्तम दर्जाच्या फळांची टंचाई आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता बाजारात डाळिंब बारमाही उपलब्ध असतात. परंतु, महाराष्ट्रात डाळिंब तयार व्हावयाला अजून काही कालावधी लागेल. त्यासोबतच गुजरात आणि राजस्थानवरून डाळिंबाची आवक सुरू झाल्यावर दर निश्चितच उतरतील अशी अपेक्षा आहे. – मुकद्दर शेख, डाळिंब व्यापारी, एपीएमसी फळ मार्केट