पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकी वसुलीसाठी व्यापक स्वरूपात जनजागृती केल्यानंतरही शहरातील ७६ हजार ६८८ मिळकतधारकांकडे ४९८ काेटींची थकबाकी आहे. या थकबाकीदार मिळकतधारकांना २०२५-२६ या आर्थिक वर्षांच्या देयकासोबतच जप्तीपूर्व नोटीस पाठविण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्याेगिक, माेकळे भूखंड, मिश्र अशा सहा लाख ३२ हजार मिळकती आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या ९२ हजार नवीन मिळकतींची नाेंदणी झाली आहे. या मिळकतींकडून महापालिका कर वसूल करते. ऑनलाइनसह राेखीने कर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरून किंवा मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन कर भरल्यास, सामान्य करात दहा टक्के, महिलांच्या नावावर नोंद असलेल्या मिळकतींवर ३० टक्क्यांपर्यंत करसवलत दिली जात आहे. ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ऑनलाइन माध्यमातून एक लाख ८९ हजार ८२३ नागरिकांनी कर भरून दहा टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून १८९ काेटी ५२ लाख रुपये जमा झाल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळकतकर हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. थकीत कर न भरल्यास नियमानुसार मिळकत जप्तीची कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदारांनी वेळेत कर भरून सहकार्य करावे. – प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.