पुणे : हिंजवडी आयटी पार्कमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी अखेर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. हिंजवडी टप्पा एक, दोन व तीनमधील मेट्रो मार्गिकेलगत आणि अन्य भागांतील रस्त्यांवरील पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ता दुरुस्तीसह इतर कामे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह इतर यंत्रणेच्या माध्यमातून सुरू झाली आहेत.
हिंजवडीतील समस्या सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी निर्देश दिले होते. ‘पीएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, ‘एमआयडीसी’चे मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ता दुरुस्तीसह इतर नागरी समस्यांबाबत कामे सुरू आहेत, असे ‘पीएमआरडीए’ने म्हटले आहे.
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयसीटीएमआरएल) कंपनीकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू आहे. या कंपनीकडून मेट्रो स्थानक व मेट्रो मार्गादरम्यानचा राडारोडा उचलला जात आहे. ‘एमआयडीसी’कडून डोहलर कंपनीसमोर आणि साई प्रोविजो इमारतीच्या ठिकाणी वनविभागाच्या जागेलगत पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराचे काम सुरू आहे. तसेच, मेट्रो मार्गिकेलगतच्या नाल्यांच्या सफाईचे काम करण्यात येत आहे, असे ‘पीएमआरडीए’ने नमूद केले आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई
‘पीएमआरडीए’च्या परवानगी विभागाने विलास जावडेकर यांच्या प्रकल्पास नोटीस बजावली आहे. जावडेकर इमारतीच्या ठिकाणी बांधलेला अनधिकृत रॅम्प तोडण्यात येत आहे. हिंजवडी टप्पा दोनमधील पांडवनगर येथील राडारोड्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. ‘पीआयटीसीएमआरएल’ आणि ‘एमआयडीसी’कडून आयटी पार्कमधील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत आहे. ‘पीआयटीसीएमआरएल’कडून मेट्रो स्थानकांच्या ठिकाणी दिशादर्शक व योग्य माहितीफलक लावण्यात आले आहेत, असे ‘पीएमआरडीए’ने स्पष्ट केले आहे.