पुणे : युवा कलाकारांसह बुजुर्ग कलाकारांच्या गायन-वादनाचा सुरेल संगमाच्या आयोजनाने रसिकाग्रणी श्रीराम पुजारी यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यात आले. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी ‘पूरिया धनाश्री’ रागगायन आणि पं. विनायक तोरवी यांचे शिष्य सिद्धार्थ बेलामनू यांनी ‘मियाँ मल्हार’ रागगायनातून किराणा घराण्याच्या गायकीचे सौंदर्य उलगडले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश जोशी, कार्याध्यक्ष डॉ. नवनीत तोष्णीवाल, माजी न्यायमूर्ती उमेश लळीत, रोहिणी पटवर्धन, कलापिनी कोमकली, बाळासाहेब जोशी, राम कोल्हटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात रागिणी शंकर यांनी व्हायोलिनवादनातून ‘नटभैरव’ रागाचे सौंदर्य उलगडले. ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग आणि ‘नरवर कृष्णासमान’ या नाट्यगीताच्या सुरावटी वाजवून त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली. भुवनेश कोमकली यांनी आपले आजोबा पं. कुमार गंधर्व यांनी ‘तोडी’ रागात रचलेली बंदीश गाऊन मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर ‘बिलावल’ रागातील दोन बंदिशी, संत सूरदास यांचे भजन आणि संत कबीर यांची निर्गुणी रचना त्यांनी सादर केली. ‘मुलतानी’ रागातील बंदिशीनंतर पं. व्यंकटेश कुमार यांनी ‘खमाज’ रागातील ठुमरी सादर केली. ‘रामदासी मल्हार’ राग आणि भैरवी सादर करून त्यांनी कार्यक्रमाची समाप्ती केली.