पुणे : मद्यपी वाहनचालकांकडून होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी शहरात मद्यपी वाहनचालकांवरिुद्ध ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ कारवाई सुरू करण्यात आली आहे. लष्कर भागातील पूलगेट परिसरात रात्रपाळीत मद्यप्राशन करुन उपनिरीक्षक मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करत असल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी मद्यपी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले. संजय सुधाकर माटेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. उपनिरीक्षक माटेकर हे लष्कर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत.
यांचीय २९ जून रोजी लष्कर भागातील पूलगेट पोलीस चौकीसमोर नाकाबंदीसाठी नेमणुक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर असलेले पोलीस कर्मचारी मद्यपी वाहनचालकांची तपासणी करत होते. तपासणी करताना एका मोटारचालकाशी त्यांचा वाद झाला. मोटाराचालक नवी मुंबईतील होता. ठेकेदार असलेला मोटारचालक आणि मित्र तेथून निघाले होते. त्या वेळी ठेकेदार अरुण सूर्यवंशी आणि मित्रांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले होते. सूर्यवंशी यांच्याकडे रिव्हाॅल्वर सापडले होते. चौकशीत त्यांच्याकडे शस्त्रपरवाना असल्याचे उघडकीस आले होते. त्या वेळी वादावादी झाल्याने सरकारी कामात अडथळा आण्लयाप्रकरणी सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता.
त्या वेळी उपनिरीक्षक माटेकर हे ओरडत होते. माटेकर यांनी मद्यप्राशन केल्याचा संशय होता. त्यामुळे माटेकर यांच्यासह ठेकेदार सूर्यवंशी यांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासणीत सूर्यवंशी, तसेच उपनिरीक्षक माटेकर यांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. उपनिरीक्षक माटेकर यांची चौकशी करण्यात आली. त्यांचे वर्तन अशोभनीय असून, पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवून माटेकर यांना निलंबित करण्याचे आदेश उपायुक्त हिमत जाधव यांनी दिले.