पुणे : पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेने यंदा विशेष ‘टॉयलेट सेवा’ मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या ॲपच्या माध्यमातून वारी मार्गावरील फिरती स्वच्छतागृहे आणि त्यांची स्वच्छता यांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे.
पालखी मार्गावर विविध ठिकाणी फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यानुसार श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर १ हजार ८०० स्वच्छतागृहे, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर १ हजार २०० स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच, श्री संत सोपान महाराज पालखी मार्गावर ३०० स्वच्छतागृहांची सुविधा आहे. या स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापनासाठी विशेष मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून, या ॲपच्या माध्यमातून विविध सेवा उपलब्ध होणार आहेत.
या सुविधा मिळणार
- स्वच्छतागृहांची उभारणी आणि स्थिती कळणार. क्यूआर कोड स्कॅनरचा वापर
- नागरिकांना प्रतिक्रिया किंवा सूचना नोंदविता येणार
जिल्हा परिषदेचा हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत वारकऱ्यांच्या सेवेत एक महत्त्वाची भर घालणार आहे. – गजानन पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद.